- January 19, 2025
- No Comment
उद्यापासून जिल्हा परिषदेपुढे शिक्षकांचे साखळी उपोषण

जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर जिल्हा परिषद प्रशासनाची भूमिका उदासीन आहे. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी धरणे आंदोलन व साखळी उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. २० जानेवारीला जिल्हा परिषदेपुढे धरणे आंदोलन करत साखळी उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे. २१ जानेवारीलाही आंदोलन, उपोषण कायम राहणार आहे. ३३ टक्के विषय शिक्षकांना वेतन्नोती त्वरित देण्यात यावी, विस्तार अधिकारी पदोन्नतीकरिता
अचूक सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून केंद्र प्रमुख पदोन्नती प्रक्रिया सुरु करण्यात यावी, माध्यमिक शिक्षकांची पदे पदोन्नतीने त्वरित भरण्यात यावी, मुख्याध्यापक पदोन्नतीकरिता सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, केंद्र प्रमुख किंवा उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर पदवीधर शिक्षकांची कपात केलेल्या वेतनवाढीची माहिती शासनास सादर करण्यात यावी, मराठी-हिंदी भाषा सूटचे आदेश काढण्यात यावे, वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणीची प्रकरणे निकाली काढावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी केले आहे.




