- January 19, 2025
- No Comment
पुणे महापालिका भवनजवळ दोघांना लुटले, रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल

पुणे: शहरात मागील काही काळापासून पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांची वाढ झाली आहे. पादचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून रोकड आणि मोबाइल चोरून नेल्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना महापालिका भवन परिसरात घडली.
शहराच्या मधोमध गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पीएमपी बसची वाट पाहत थांबलेल्या दोघांना रिक्षाचालक तसेच त्याच्या साथीदाराने लुटले. महापालिका भवन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी जितेंद्रकुमार बाबूलाल (वय २९, सध्या रा. सूस गाव, पाषाण-सूस लिंक रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्रकुमार बाबूलाल आणि त्यांचा मेहुणा हे दोघेही मजुरीचे काम करतात. दोघे महापालिका भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुलावर शनिवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास बसची वाट बघत थांबले होते. त्यावेळी एक रिक्षाचालक आणि त्याचा साथीदार तिथे आले. रिक्षाचालकाने बाबूलाल याच्याकडे कुठे जायचे आहे अशी विचारणा केली. त्यानंतर बाबूलाल आणि त्यांच्या मेहुण्याला मारहाण करण्यात आली. तसेच रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने या दोघांकडील १४०० रुपये काढून घेतले. तसेच बाबूलाल याला धमकावण्यात आले. ऑनलाइन पद्धतीने त्याला एक हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानंतर रिक्षाचालक आणि त्याचा साथीदार तिथून पसार झाले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत




