- January 20, 2025
- No Comment
आंबेगाव येथे अज्ञान आरोपींनी गोळीबार केल्याचा बनाव करत रात्रभर पोलिसांची धावपळ झाली प्रकार कोंढवा परिसरात झाल्याचे निष्पन्न

पुणे : कोंढव्यातील साळवे गार्डन येथे बसले असताना दोघेही गुंड एकमेकांना आपल्याकडील पिस्टल दाखवत होते. त्यावेळी तडीपार गुंड अनिल चव्हाण याच्याकडून मिसफायर होऊन त्यात गुन्हेगार प्रदीप सावंत याला गोळी लागली. त्यानंतर जखमी झालेला प्रदीप सावंत हा नऱ्हे येथील सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला. मात्र, त्याने आंबेगाव येथे अज्ञान आरोपींनी गोळीबार केल्याचा बनाव केला. त्यामुळे रात्रभर पोलिसांची धावपळ झाली. त्यानंतर हा प्रकार कोंढवा परिसरात झाल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिल चव्हाण हा सुपर इंदिरानगर येथे राहणारा आहे. अनिल चव्हाण व त्याच्या साथीदारांनी बिबवेवाडी परिसरात टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी मालमत्तेचे नुकसान करणे, खुनाचा
प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवणे असे गंभीर गुन्हे केले असल्याने त्याला २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. प्रदीप सावंत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. प्रदीप सावंत आणि अनिल चव्हाण हे कोंढव्यातील साळवे गार्डन येथे शनिवारी रात्री साडेनऊ वाजता बसले होते. दोघांकडे पिस्टल्स होत्या. ते एकमेकांना पिस्टल दाखवत होते.
त्यावेळी अनिल चव्हाण याच्याकडील पिस्टलातून गोळी झाडली गेली. ती लागून प्रदीप सावंत जखमी झाला. त्यानंतर प्रदीप सावंत हा नऱ्हे येथील सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला. त्याने तेथे आंबेगाव येथे अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याचे सांगितले. त्यामुळे सिंहगड रोड, भारती विद्यापीठ पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनेची माहिती घेत होते. परंतु, तशी कोणतीही घटना घडल्याचे दिसून आले नाही. तेव्हा त्याच्याकडे पुन्हा चौकशी केली. तेव्हा हा प्रकार कोंढव्यात घडल्याचे
सांगितले. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, जखमी प्रदीप सावंत याने अगोदर हा प्रकार कात्रज येथील स्वामी नारायण मंदिराजवळ झाल्याचे सांगितले. परंतु, प्रत्यक्षात तो कोंढवा परिसरात झाल्याचे समोर आले आहे. कोंढवा पोलीस हॉस्पिटलमध्ये गेले असून त्याचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.




