- January 20, 2025
- No Comment
पुणे जुन्या मालमत्तेच्या वादातून तिघांवर कोयत्याने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; भवानी पेठेतील घटना
पुणे : जुन्या मालमत्तेवरुन होत असलेल्या वादामुळे ते भवानी पेठेतून उत्तमनगरला रहायला गेले. बकरे बघण्यासाठी आले असताना त्यांच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत मेहमुद बाबु घोडके (सध्या रा. कोपरेगाव, उत्तमनगर, मुळ रा. मटण मार्केटजवळ, भवानी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फरदीन आसीफ घोडके (वय २३), सालीम नईम घोलप (वय २१), साहिल घोडके (वय २०, सर्व रा. मटण मार्केट, भवानी पेठ) यांना अटक केली आहे. या घटनेत फिर्यादी मेहमुद घोडके, त्यांचा मुलगा
अमान मेहमुद घोडके आणि रईस याकुब घोडके हे जखमी झाले आहेत. हा प्रकार भवानी पेठेतील आदमाने बिल्डिंगखाली १८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पूर्वी भवानी पेठेत राहत होते. आरोपी हे त्यांचे नातेवाईक असून त्यांच्या भवानी पेठ येथील जुन्या मालमत्तेवरुन वाद आहे. फिर्यादी सध्या कोपरे गावात रहायला गेले
आहेत. शनिवारी रात्री फिर्यादी व त्यांचा मुलगा अमान हे रईस घोडके यांच्याकडे बकरे पाहण्यासाइी आले होते. त्यावेळी आरोपींनी संगनमत करुन त्यांच्याकडील धारदार हत्यारे हवेत फिरवून दहशत माजविली. अमान घोडके याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात वार करुन तसेच
लाथाबुक्क्यांनी त्याच्या तोंडावर, शरीरावर मारहाण केली. फिर्यादी यांना साहिल घोडके व त्याच्या साथीदारांने मारहाण केलेल्या त्यांचे तीन दात पडले. सालीम घोलप याने फिर्यादी यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार केले. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करीत आहेत.