- January 22, 2025
- No Comment
इन्स्टावरील मैत्री पडली महागात, तरुणीवर वारंवार सामूहिक बलात्कार

पुणे: इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीमधून एका १८ वर्षीय तरुणीवर दोघा जणांनी तिच्याच घरात सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
एवढेच नव्हे तर, पीडितेचे नग्नावस्थेतील व्हीडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
नीरज गुप्ता (वय अंदाजे २०, रा. आकुर्डी, पिंपरी-चिंचवड) आणि मयूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी १८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पीडित मुलीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून तिची आई पुणे जिल्ह्यातील गावामध्ये राहते. ही तरुणी आणि तिचा मोठा भाऊ शिक्षणानिमित्त पुण्यामध्ये चुलत्याच्या घरी राहतात. पीडित तरुणी बारावीत शिकते. तिच्या इन्स्टाग्राम आयडीवर आरोपी नीरज गुप्ता याने एप्रिल २०२४ मध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यामध्ये इन्स्टावर चॅटिंग सुरू झाले. त्यांच्यामध्ये संपर्क वाढला. त्यांच्यामध्ये इंस्टा मेसेंजर, तसेच व्हॉटसॲपद्वारे व्हॉईस आणि व्हीडीओ कॉलिंगद्वारे बोलणे होत होते.
त्या दोघांमध्ये जवळीक वाढली. आरोपीने तिला भेटण्याकरीता बोलावले. तिने सुरुवातीला नकार दिला, पण त्याने तिच्या घराचा पत्ता विचारला. या मुलीने त्याला जुलै २०२४ च्या पहिल्या आठवड्यामध्ये राहत्या घराचा पत्ता दिला. तो त्याच दिवशी दुपारी तिच्या घरी आला. त्यावेळी ही तरुणी घरामध्ये एकटीच होती. त्यांच्या गप्पा सुरू असतानाच त्याने तिच्या अंगचटीला येण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला असता त्याने चांगल्या मित्रांमध्ये सध्या असे सर्व चालते, असे म्हणत ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे सांगितले. यावेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यावेळी आरोपीने पीडितेचे व्हीडीओ आणि फोटो काढले. त्यावेळी, त्याने आठवण म्हणून हा व्हीडीओ आणि फोटो काढल्याचे तसेच कोणालाही ते शेअर करणार नाही असे सांगितले. त्यानंतर आरोपी पुन्हा डिसेंबर २०२४ मध्ये तिच्या घरी गेला. त्यावेळीदेखील तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी तरुणीने विरोध केला असता आधीचे व्हीडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच्या भीतीने तिने कोणाकडे याबाबत वाच्यता केली नाही. आरोपी वारंवार तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. तसेच, वारंवार घरी येण्यासाठी आग्रह धरीत होता.
ही पीडित मुलगी १८ जानेवारी रोजी देखील घरामध्ये एकटीच होती. त्यावेळी आरोपी नीरजने व्हीडीओ आणि फोटो व्हायरल करू नयेत, याकरिता तिने घाबरून त्याला घरी एकटीच असल्याबाबत कळवले. सकाळी साधारण साडेनऊ-दहाच्या सुमारास तिच्या घरी आला. त्यावेळी त्याचा मित्र मयूर हादेखील सोबत होता. आरोपीने तिच्याशी त्याची ओळख करून दिली. हे तिघे घरामध्ये बसलेले असताना आरोपी नीरजने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी तिने त्याला विरोध केला. त्यावेळी त्याने पुन्हा व्हीडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यावेळी आरोपीने दोघांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकला. तिला भीती घालून तसेच धमकावत तिच्या घराच्या बेडरूममध्ये आळीपाळीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सुरुवातीला आरोपी नीरज आणि त्यानंतर मयूर याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दोघेही तिथून निघून गेले. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने आईला या संदर्भात फोन करून माहिती दिली. पीडित मुलीच्या आईने पुण्यात धाव घेतली. आईने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर, या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.




