- January 22, 2025
- No Comment
हडपसरमधील खुनाच्या गुन्ह्यात 5 जणांना 7 वर्षांची शिक्षा; सत्र न्यायालयाचा निर्णय

हडपसर (पुणे):अंगावर आलेल्या पाळीव कुत्र्याला हाकलल्याच्या कारणावरुन तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके, सिमेंटच्या ब्लॉकने मारुन त्याचा खुन करण्यात आला होता.
या खुन प्रकरणी सत्र न्यायालयाने पाच जणांना ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
गणेश सुभाष वाबळे (वय २४, रा. डावरीनगर) गोरक्ष नामदेव लोंढे (वय २०, रा. माळवाडी, हडपसर), उमेश उत्तरेश्वर खंडागळे (वय २०, रा. शेवाळवाडी, हडपसर), प्रदिप ज्ञानदेव करपे (वय २२, रा. काळेपडळ) आणि किशोर बापू लोंढे (वय १८, रा. माळवाडी, हडपसर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. सागर नामदेव चौगुले (वय २७, रा. हडपसर) यांचा खुन झाला होता. ही घटना हडपसरमधील डावरीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ २७ जुलै २०१६ रोजी रात्री ११ वाजता घडली होती.
गणेश वाबळे याचा कुत्रा सागर चौगुले यांचा मित्र शिंदे यांच्या अंगावर गेले होते. त्यावेळी शिंदे यांनी कुत्र्याला हकलले होते. त्याचा राग मनात धरुन तक्रारदार शिंदे यांचा मित्र सागर याच्या डोक्यात दांडके मारुन व सिमेंट ब्लॉकने मारहाण करुन खुन केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांनी केला व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील निवेदिका काळे, कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार अविनाश गोसावी यांनी काम पाहिले. साक्षी पुरावे ग्राह्य धरुन सत्र न्यायालयाने आरोपींना ७ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ९ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी या कामगिरीकरता प्रोत्साहन म्हणून कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संदिप देशमाने यांना १० हजार रुपयांचे बक्षिस मंजूर केले आहे.




