- January 24, 2025
- No Comment
माजी उपमहापौर आबा बागुलांच्या मुलाकडून दुचाकी चालकाला बेदम मारहाण, कारला धक्का लागल्याने वाद

पुणे: पुण्यात माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलाने दुचाकी चालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा वाद गाडीच्या धडकेवरून उफाळला असून, या प्रकरणी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत.
तक्रारदार फय्याज सय्यद यांनी आपल्याला मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
गाडीला डेंट गेल्यामुळे वाद वाढला
मंगळवार पेठ येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. फय्याज सय्यद हे मालधक्का चौकातून मंगळवार पेठेकडे जात होते. पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या लाल गाडीतील चालकाने अचानक गाडीचा दरवाजा उघडला. यामुळे सय्यद यांची दुचाकी बाजूला उभ्या असलेल्या काळ्या गोल्डस्टार गाडीवर आदळली. गाडीला डेंट गेल्याने संतप्त झालेल्या हेमंत बागुल यांनी सय्यद यांना मारहाण केली.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, यात हेमंत बागुल यांनी सय्यद यांना मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. सय्यद यांनी याबाबत पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत हेमंत बागुल यांनी गोळी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तक्रारदाराचा दावा आहे की, बागुल यांच्या राजकीय दबावामुळे पोलीस कारवाईस विलंब करत आहेत.
सय्यद यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये हेमंत बागुल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, तर बागुल यांनीही सय्यद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सध्या कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समजते.




