- January 24, 2025
- No Comment
माल वाहतूक करणार्या नामांकित कंपनीच्या कारकूनाने केली कंपनीची 55 लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांनी वेशांतर करुन चार आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पुणे: देशभरात मालवाहतूक करणार्या नामांकित कंपनीतील कारकूनानेच मित्राच्या मदतीने कंपनीच्या गुगल शीटमध्ये फेरफार करुन खर्या व्हेंडरच्या बँक खात्याची माहिती बदलून कंपनीची ५५ लाख ५४ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सायबर पोलिसांनी वेशांतर करुन चौघांना अटक केली आहे.
आकाश करिअप्पा गायकवाड (रा. ए जे पाटीलनगर, सोलापूर), शिवानंद बसवराज तळवडे (रा. विजापूर रोड, सोरेगाव, सोलापूर), कंपनीतील कारकून उमेर हमीद शेख (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि त्याचा मित्र सोन्या ऊर्फ आकाश राजू परीट (रा. म्हाडा कॉलनी, नागपूर चाळ, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वडगाव शेरी येथील माल वाहतूक करणार्या एका नामांकित कंपनीला २१ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ दरम्यान कोणीतरी कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कट करुन कंपनीचे व्हेंडरच्या कामाच्या पेमेंट संदर्भात असलेल्या गुगल शीटच्या लिंक मध्ये कंपनीच्या दिल्ली येथील खर्या व्हेंडरच्या बँक खात्याची माहिती बदलून सायबर चोरट्याने स्वत:चे बँक खाते क्रमांकाची माहिती टाकून गुगल शीट कंपनीला ऑनलाईन दाखल केली. दाखल केलेली माहिती ही खर्या व्हेंडरने पाठवलेली आहे, असे कंपनीच्या फायनान्स विभागास भासवुन फायन्सास विभागाला बँक खाते कंपनीच्या सिस्टीममध्ये जोडण्यास भाग पाडले. खर्या व्हेंडरला माल वाहतूकीबाबत ट्रान्सफर करावयाचे पेमेंट ५५ लाख ५४ हजार ९९९ रुपये हे चोरट्याच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यास लावून कंपनीची फसवणूक केली होती. ६ जानेवारीला कंपनीच्या व्यवस्थापकाने तक्रार सायबर पोलिसांकडे दाखल केली.
कंपनीचे गुगल शीट लिंक बाबत तांत्रिक विश्लेषण करुन तसेच पैसे ट्रान्सफर झालेल्या बँक खात्याबाबतची माहिती घेतल्यावर आरोपी सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप कदम, पोलीस अंमलदार नवनाथ कोंडे, संदिप पवार, दिनेश मरकड हे सोलापूरला रवाना झाले. आकाश गायकवाड व शिवानंद तळवडे या दोन आरोपींना वेशांतर करुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी मालवाहतूक करणार्या नामांकित कंपनीतील कारकून उमेद हमीद शेख याने त्याचा मित्र सोन्या ऊर्फ आकाश राजू परीट याच्या मदतीने कंपनीच्या गुगल शिटमध्ये फेरफार करुन काढून घेतले. ती रक्कम सर्वांनी वाटून घेतली. सोलापूरवरुन आलेल्या पथकाने येरवड्यातून उमेर शेख व आकाश परिट यांना अटक केली.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले की, आकाश गायकवाड याला यातील तांत्रिक ज्ञान होते. इतरांनी बँक खाते उघडणे व पैसे जमा झाल्यावर ते परस्पर वाटून घेणे, ही कामे केली. या चौघांकडून ३० लाख रुपये जप्त केले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदिप कदम, पोलीस अंमलदार कोंडे, संदिप पवार, दिनेश मरकड, मुंढे यादव, नागटिळक यांनी केले आहे.




