- January 25, 2025
- No Comment
भांडारकर रोडवरील बंगल्यात शिरुन चोरी करणारा सराईत गुन्हेगार गजाआड

पुणे: भांडारकर रोडवरील बंद बंगला पाहून बाथरुमच्या खिडकीचे गज उचकटून घरात प्रवेश करुन चोरी करणार्या सराईत चोरट्याला डेक्कन पोलिसांनी पकडले. आई आणि मावशीच्या सहाय्याने त्याने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. मावशीच्या नावावरही गुन्हे दाखल आहेत.
गणेश प्रकाश आव्हाड (वय २०, रा. शासकीय हॉस्पिटल समोर, घनसांगवी, जालना) असे या चोरट्याचे नाव आहे.
भांडारकर रोडवरील शांतीकुंज या बंगल्यात राहणारे व्यावसायिक लग्नानिमित्त जयपूरला १३ डिसेंबर रोजी दुपारी गेले. चोरट्याने बंद बंगला पाहून त्याच्या बाथरुमच्या खिडकीचे गज काढून आत प्रवेश केला. बेडरुमचे बाजूला असलेल्या रुममधील तीन लोखंडी कपाटे तसेच एक लाकडी कपाट उचकटले. लोखंडी कपाटात ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड व ५० हजार रुपयांचे देवघरातील देवाची मूर्ती, चांदीचे देवाचे दागिने असा १ लाख रुपयांचा ऐवज चोरी करुन नेला होता. १४ डिसेबर रोजी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला होता.
डेक्कन पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात तिघे संशयित आढळून आले. तांत्रिक माहितीवरुन घरफोडी करणारी व्यक्ती ही जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने जालना येथे जाऊन गणेश आव्हाड याला अटक केली आहे. त्याच्याकडून देवघरातील चोरलेली देवाची मूर्ती, दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
गणेश आव्हाड हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी मुंबई आणि ठाणे येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. घनसांगवी येथून तो चोर्या करण्यासाठी निघतो. बंद घरे, बंगले पाहून चोर्या करुन पुन्हा गावाला पळून जातो़, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी सांगितले.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर, गभाले, महेश शिरसाठ, सागर घाडगे, वसीम सिद्धीकी, रोहित पाथरुट, धनाजी माळी, रोहित मिरजे यांच्या पथकाने केली.