- January 25, 2025
- No Comment
शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने महिलेचे १५ लाख लंपास

पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेची १५ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंगळवार पेठेतील एका ४६ वर्षीय महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील २१ ऑक्टोबर रोजी महिलेच्या मोबाईलवर जतिन जाधव या नावाच्या व्यक्तीने संदेश पाठविला. त्याने शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष महिलेला दाखविले.
त्यानंतर महिलेने सायबर चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात सुरुवातीला काही रक्कम भरली. चोरट्यांनी महिलेला परतावा देत विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १४ लाख ८२ हजार रुपये जमा केले. परंतु चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही. त्यानंतर महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव करीत आहेत.