- January 25, 2025
- No Comment
हाॅटेल व्यावसायिकाला खंडणी मागणारा गजाआड, येरवडा पोलिसांची कारवाई

पुणे: येरवड्यातील लक्ष्मीनगर भागातील हाॅटेल व्यावसायिकाला 20 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका तरूणाला येरवडा पाेलिसांनी अटक केली आहे. इस्माइल मैनुद्दीन शेरेकर (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत एका हाॅटेल व्यावसायिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचे हाॅटेल आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी शेरेकर हाॅटेलमध्ये गेला. त्याने हाॅटेल व्यावसायिकाकडे दरमहा 20 हजार रुपये हप्ता मागितला, तसेच फुकट जेवण देण्याची मागणी केली. तसेच याव्यतिरिक्त पैसे न दिल्यास हाॅटेलची तोडफोड करण्याची धमकी देऊन तो पसार झाला.
त्यानंतर घाबरलेल्या येरवड्यातील हाॅटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांकडून शेरेकरला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक मिथून सावंत याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.