- January 29, 2025
- No Comment
बनावट नोंदी करुन सिक्युरिटी कंपनीला घातला 2 कोटींचा गंडा आरोपीस अटक

पुणे : सुरक्षा रक्षक पुरविणार्या कंपनीमधील मनुष्यबळ विकास अधिकार्याने कंपनी सोडून गेलेल्या कामगारांना कामावर दाखविणे, कामगारांचे पी एफ, जी एस टी, ईएसआयसी इत्यादी मध्ये पाठविण्याचे पैसे तेथे भरणा न करता स्वत:चे व नातेवाईकांच्या खात्यात वर्ग करुन तब्बल २ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. जीएस टी, ई एस आयसी मध्ये पैशांच्या वेळेत भरणा न केल्याने त्या विभागाकडून मोठ्या आर्थिक दंडाच्या नोटिसा प्राप्त झाल्याने हा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सुप्रिया अविनाश संकपाळ (वय ३७, रा. अंजनी अपार्टमेंट, चंदननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संदेश संजय तरटे (रा. प्रणिती हाईटस, आव्हाळवाडी) याला अटक केली आहे. हा प्रकार चंदननगर येथील राघवेंद्रनगरमधील सायन व्हिजिलंट कंपनीत १ एप्रिल २०१६ ते ३० ऑगस्ट २०२० दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुप्रिया संकपाळ यांची सायन व्हिजिलंट सर्व्हिसेस ही सिक्युरिटी गार्ड पुरविणारी कंपनी आहे. त्यांच्याकडे संदेश तरटे हा कंपनीत अॅडमीनपदावर काम करत होता. कामगारांचे पगार करणे, तसेच कंपनीचे शासकीय खात्यातील सर्व आर्थिक व्यवहार पाहणे तसेच कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि गुडस अँड सर्व्हिसेस टॅक्स इत्यांदी सर्व आर्थिक व्यवहार तो पाहत होता. सर्व आर्थिक व्यवहार तो पहात असल्याने कंपनीचे सर्व ऑनलाईन अॅक्सेस संदेश तरटे याच्याकडेच होते.
कोवीड काळात कंपनी बंद होती. त्यामुळे २०२३ पासून हळुहळु कंपनीने काम बंद केले. कंपनी बंद होत असताना त्या करीता भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि जीएस टी या कार्यालयाकडून नोटीस येत असत. त्यावेळी संदेश तरटे याने दिलेल्या हार्ड डिस्कवरील माहितीच्या आधारे कंपनीने या विभागाला पाठविलेले चलन व संदेश तरटे याने पाठविलेले ई मेल चेक केले असता संदेश तरटे याने कामगारांचे मासिक पगार खाते याचे रेकॉर्ड हे स्वत: डिलिट केल्याचे दिसून आले. जास्त खोलात जाऊन चौकशी केल्यावर संदेश याने कंपनीकडून जी एस टी, पी एफ व ई एस आयसी मध्ये कामगारांचे पेमेंट त्या ठिकाणी न भरता ते कंपनीच्या खात्यातून परस्पर इतरत्र वळविल्या आहेत. कंपनीमधून काम सोडून गेलेल्या कामगारांचे पगार कामावर आहेत, असे दाखवून ते स्वत:चे खाते क्रमांक टाकून ते त्यामध्ये वळवुन घेतले.
कंपनीला आय सी आय सी आय बँकेकडून सी एम एस पोर्टल उपलब्ध असल्याने त्यामध्ये सुद्धा संदेश याने काही पगार हे त्यामधून स्वत:चे व वडिल संजय तरटे यांच्या बँक खात्यात पाठविले आहे. त्याने ऑनलाईन १३ लाख ३१ हजार ११२ रुपये हे त्याचे नातेवाईक यांच्या बँक खात्यात वळवुन घेतले. खोटी पगाराचे खाते बनविले आहे. कंपनीच्या चालू खात्यातून स्वत:चे वडिल, भाऊ, काका, काकु तसेच आईच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन २०१५ ते २०२० या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेऊन साधारण दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक केली आहे. चंदननगर पोलिसांनी संदेश तरटे याला अटक केली आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे अधिक तपास करीत आहेत.