- February 2, 2025
- No Comment
४० लाखांच्या बदल्यात mpsc परिक्षेची प्रश्नपत्रिका व अॅन्सर की विद्यार्थ्यांना देतो, असे सांगून फोन करणार्या दोघांना चाकण मधून अटक

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परिक्षा येत्या रविवारी २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या परिक्षेपूर्वी नाशिक, पुणे येथील विद्यार्थ्यांना फोन करुन ४० लाखांच्या बदल्यात परिक्षेची प्रश्नपत्रिका व अॅन्सर की विद्यार्थ्यांना देतो, असे सांगून फोन करणार्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने चाकण येथील म्हाळुंगे एम आय डी सी मधून पकडले आहे
दीपक दयाराम गायधने (वय २६, रा. चाकण, मुळ रा. तामसवाडी, ता. तुमसर, जि. भंडारा) आणि सुमित कैलास जाधव (वय २३, रा. चाकण, मुळ रा. वेहेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडे केलेल्या तपासामधून त्यांना योगेश सुरेंद्र वाघमारे (रा. सोनाली, ता. वराठी, जि. भंडारा) याने नाशिक येथील २४ उमेदवारांची यादी दिली होती. त्या यादीमधील नांदगाव जि. नाशिक येथील दोन विद्यार्थ्यांना फोन कॉल केले असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे व नाशिक येथील काही उमेदवारांना ४० लाखांच्या बदल्यात प्रश्नपत्रिका व अॅन्सर की देऊ असे सांगणारे व्हॉटसअॅप कॉल आल्याने एकच खळबळ उडाली होती. यापूर्वी शिक्षक पात्रता परिक्षा परिक्षेमध्ये अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर प्रश्नपत्रिका व अॅन्सर की परिक्षा घेणार्या शिक्षण परिषदेच्या संचालकांकडून पेपर फोडण्यात आले होते. त्यामुळे आता एमपीएससीचे पेपरही फोडले जातात, असे उमेदवारांना वाटु लागले होते. त्यामुळे एमपीएससीच्या वतीने सचिव खरात यांनी फिर्याद दिली. खंडणी विरोधी पथकाने फोन कॉल करणार्या दोघांना चाकणहून अटक केली. योगेश वाघमारे याच्या शोधार्थ पुणे गुन्हे शाखेचे पथक नागपूरला रवाना झाले आहे. आरोपीला नागपूर क्राईम ब्रँचच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. या अनुशंगाने नागपूर पोलिसांकडे काही लोकांकडे तपास सुरु आहे.
नाशिक येथील २४ उमेदवारांची यादी तसेच नागपूर मधील संशयितांकडे काही याद्या कशा प्राप्त झाल्या. तसेच या यादीतील उमेदवार या वर्षी परिक्षेला बसलेले आहेत का याबाबत तपास सुरु आहे. अद्यापपर्यंत तपासात एम पी एस सीचा पेपर फुटल्याबाबत काहीही निष्पन्न झालेले नाही.
याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक यशवंत आंबासे, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सैदोबा भोजराव, संग्राम शिनगारे, प्रशांत शिंदे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, चेतन आपटे, अजिनाथ येडे, पवन भोसले, गणेश खरात, प्रफुल्ल चव्हाण, किशोर बर्गे, मयुर भोकरे, सयाजी चव्हाण, रणजित फडतरे, राजेंद्र लांडगे, गितांजली जाभुळकर यांनी केली आहे.




