- February 3, 2025
- No Comment
धक्कादायक! पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 300 कोटींची संपत्ती उघड

पुणे: पुणे शहराचे माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीमध्ये तब्बल 300 कोटींची संपत्ती उघड झाली असल्याचा दावा केला जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्ता यांच्या संपत्ती बाबत गुप्त चौकशी पूर्ण केली असून आता उघड चौकशीसाठी परवानगी मागण्यात आली आहे. अशाप्रकारे उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्याची चौकशी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे.
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीची मागणी केली होती. लाचलुचपत विभागाने केलेल्या चौकशीत काही तथ्ये समोर आल्यानंतर आता विभागाने त्यांच्या उघड चौकशीची मागणी केली आहे. अमिताभ गुप्ता यांची उघड चौकशीची मागणी मान्य झाल्यास त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत आल्हाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ गुप्ता यांनी तब्बल 300 कोटीहून अधिकची संपत्ती विविध राज्यांमध्ये जमवली आहे. पुण्यातील प्रसिद्ध ॲमनोरा टाउनशिप मधील स्वीट वॉटर व्हिला प्रकल्पात त्यांनी जमिनीचा प्लॉट घेऊन त्यावर आलिशान व्हिला उभारला आहे. या व्हिलाची किंमत अंदाजे 25 ते 30 कोटी असल्याची शक्यता आल्हाय यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय अमिताभ गुप्ता यांचे मुंबईतील सांताक्रुझ येथे 22 कोटींचा आलिशान फ्लॅट आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमिताभ गुप्ता यांनी जमीन आणि संपत्तीही खरेदी कल्याचे आल्हाट यांनी आपल्या तक्रारीत म्हटंल आहे.
त्यासोबतच पुणे पोलीस आयुक्तपदावर असताना अमिताभ गुप्ता यांनी 800 ते 1000 शस्त्र परवाने वाटले असून प्रत्येक परवान्यासाठी 15 ते 20 लाख रुपये घेतले असल्याचा धक्कादायक दावा देखील आल्हाट यांनी केला आहे. या सगळ्यांची विस्तृत चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी उघड चौकशी होणं आवश्यक असून उघड चौकशीसाठी सहा महिने उलटल्यानंतर देखील अद्याप परवानगी मिळालेली नाही.त्यामुळे ही परवानगी लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी आल्हाट यांनी केली आहे.