- February 3, 2025
- No Comment
महिलेची फसवणूक करणारा पोलीस शिपाई निलंबित

पुणे: एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील शिपाई कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. प्रेमसंबंध ठेवून घरातील पैसे आणि दागिने घेतल्याचा आरोप पीडित महिलेने पोलीस कर्मचाऱ्यावर केले आहेत.
निलंबित पोलीस कर्मचारी हा पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात नेमणूकीला होता अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार सुतार असे निलंबन झालेल्या पोलीस शिपाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. फिर्यादी महिला तिच्या कुटुंबासह पुण्यातील रास्ता पेठेत राहते. तिची ४ वर्षांपूर्वी तुषार सुतारशी सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमामध्ये झाले. प्रेमसंबंंधांविषयी महिलेच्या पतीला समजले. त्याने महिलेला घराबाहेर काढले.
पुढे ती महिला, तिच्या मुलीसह आंबेगाव येथे राहायला गेली. तुषारही त्यांच्यासोबत गेला. २०२१ मध्ये फिर्यादी महिलेच्या पतीचे निधन झाले. त्याच्या विमा पॉलिसीचे ९ लाख रुपये महिलेला मिळाले. या पैश्यांतील ५ लाख रुपये तुषारने नाना कारणे सांगत स्वत:च्या ताब्यात घेतले. शिवाय २२ ग्रॅम सोन्याचे दागिनेही मिळवले.
फिर्यादी महिलेने लग्नाबाबत विचारल्यास तुषार टाळाटाळ करत असे. काही दिवसांनी त्याने महिलेला मारहाण आणि शिवीगाळ करण्यासही सुरुवात केली. तसेच लग्न करण्यासही नकार दिला. तेव्हा महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर तुषार सुतारला निलंबित करण्यात आले.