- February 9, 2025
- No Comment
सीसीटीव्हीच्या बॅटरी, यूपीएस चोरणारा सराईत गुन्हेगार गजाआड

पुणे : सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांचे यु पी एस व बॅटरीज चोरी करुन नेणार्या सराईत गुन्हेगाराला संत तुकारामनगर पोलिसांनी पकडून त्याच्याकडून ५ लाख ९८ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
बुद्धभूषण प्रविण डोंगरे (रा. घरकुल, चिखली) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पिंपरी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांचे पथक हे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार जावेद मुजावर यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार बुद्धभूषण डोंगरे याने पिंपरी चिंचवड परिसरात सार्वजनिक ठिकाणी बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे साहित्य चोरी करुन लपवून ठेवले आहे. काही साहित्य विक्रीसाठी चिंचवड येथील बी आर टी रोड येथे येणार आहे.
या खबरीनुसार संत तुकारामनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी चिंचवड एम आय डी सी मधील काला ग्रुप कंपनीचे पाठीमागील सध्या बंद असलेल्या बी आर टी रोडवर सापळा रचला. तेथील बसस्टॉपजवळ दुचाकीवर उभा राहून डोंगरे कोणाची तरी वाट पहात होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या ताब्यातील साहित्याची तपासणी केल्यावर २ युपीएस व ४ एक्साइर्ड बॅटरी मिळून आल्या. त्याबाबत संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले. पोलिसांनी डोंगर याला अटक करुन अधिक चौकशी सुरु केली. त्याच्याकडून १७ बॅटरीज, २१ यु पी एस, दुचाकी असा ५ लाख ९८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
संत तुकारामनगर पोलीस ठाणे, एम आय डी सी भोसरी, काळेवाडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शाकिर जिनेडी, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिपक महाजन, पोलीस हवालदार स्वप्निल वारडे, संतोष रजपूत, पोलीस अंमलदार जावेद मुजावर, भागवत गायकवाड, अनिल वाघ यांनी केली आहे