- February 10, 2025
- No Comment
आर्थिक विवंचनेतून जीवन संपवलेल्या शिरीष मोरे महाराजांवर ३२ लाख रुपयांचं कर्ज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेडलं.

संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी तीन दिवसांपूर्वी गळफास घेत जीवन संपवलं. आर्थिक विवंचनेतून त्यांनी जीवन संपवल्याची माहिती समोर आली होती. आपण कुणाचे किती पैसे द्यायचे आहेत याची माहिती त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिली होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोरे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी वाढदिनी मोरे कुटुंबियाला ३२ लाखांची मदत केलीय.
शिरीष मोरे यांच्या आत्महत्येनं मोरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीमुळे मोरे कुटुंबियांवर असलेलं कर्जाचं ओझं कमी होणार आहे. समाजकार्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलेल्या शिरीष महाराजांच्या पश्चात मोरे कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात दिला. आमदार विजय शिवतारे यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेतली.
त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेली ३२ लाखांची रक्कम मोरे कुटुंबियांना देण्यात आली. शिरीष
महाराज यांनी पाच फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्यानं वारकरी सांप्रदयासह सर्वांनाच धक्का बसला होता. शिवव्याख्याते आणि संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज शिरीष मोरे यांचं लग्न अवघ्या काही दिवसांवर होतं. मात्र त्याआधीच त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. आत्महत्येआधी शिरीष महाराजांनी आपल्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख सुसाइड नोटमध्ये केला होता. तसंच माझं कर्ज फेडण्यासाठी मित्रांनी कुटुंबियांना मदत करावी असंही आवाहन केलं होतं.




