- February 16, 2025
- No Comment
महापालिकेतील बनावट प्रमाणपत्राचे रॅकेट उघड; दोन आरोपी गजाआड

पुणे: महापालिकेच्या कोंढवा क्षेत्रीय कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणीचे काम असलेल्या खासगी ठेकेदाराच्या कर्मचार्यांनी मृत्यूचा बनावट दाखला दिला असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी ठेकेदाराच्या दोन कर्मचार्यांना रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलिसांनी अटक केली आहे.
दिघी सागरी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार लष्कर परिसरातील एका व्यक्तीची श्रीवर्धन येथे एक एकर जमीन होती. ही जमीन त्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून 2019-2021 दरम्यान विकण्यात आली. ही बाब समोर आल्यावर मूळ मालकाने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी हा प्रकार गंभीर असल्याने त्याची तपासणी सुरू केली. त्या वेळी बनावट नावाने विक्री केलेल्या आरोपीचा पत्ता हा कात्रज येथील होता.
त्यामुळे पोलिसांनी त्या भागात चौकशी केली असता ही व्यक्ती 2021 मध्येच मृत्यू पावल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र मागविले. त्या वेळी पालिकेकडून 2021 मध्येच संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे कळविण्यात आले. पण, प्रत्यक्षात मृत्यूची नोंद झाल्याची तारीख एप्रिल 2024 दाखविण्यात आली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पुन्हा महापालिकेस पत्र पाठवत मृत्यूची नोंद कोणी केली, त्यांचे प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, नोंद करताना देण्यात आलेली कागदपत्रे, कार्यालयीन अर्जांची मागणी करण्यात आली.
मात्र, ही कोणतीच माहिती नसल्याचे पालिकेने पोलिसांना कळविले. त्यामुळे पालिकेने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी नोंद करणार्या ठेकेदारांच्या कर्मचार्यांना अटक केली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूच्या खोट्या नोंदणी केल्याने महापालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात यावेत, असे पत्र महापालिकेस पाठविण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.