- February 17, 2025
- No Comment
मद्यधुंद तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू
पिंपरी: मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अनिकेत प्रल्हाद माने (वय-२४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास काळेवाडी परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हा डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. रविवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरून जात होता. तेव्हा लघुशंका करत असलेल्या दोन तरुणांशी वाद घातले. त्याने त्यांच्या अंगावर जाऊन दोन तरुणांना मारण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी त्याला हुसकावून लावल्यानंतर घाबरून तो इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेला आणि तेथून खाली पडला. यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेबाबत पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही देखील लागले असून त्याचा कोणी घातपात तर केला नाही ना? याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी काळेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.