- February 17, 2025
- No Comment
विवाहाच्या आमिषाने तरुणीची ३५ लाखांची फसवणूक, तरुण जेरबंद
बाणेर (पुणे): विवाहाचे आमिष दाखवून संगणक अभियंता तरुणीची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना बाणेर परिसरात घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी एका तरुणाला मुंबईतून अटक केली आहे.
साईश विनोद जाधव (वय २५, रा.शेल कॉलनी रस्ता, चेंबूर, मुंबई) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत एका २९ वर्षीय तरुणीने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या तरुणावर भारतीय न्याय संहिता ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी बाणेरमधील मुलींच्या वसतिगृहात राहत असून, एका आयटी कंपनीत अभियंता आहे. या तरुणीने २०२३ मध्ये एका विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती.
आरोपी साईशने संकेतस्थळावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर तो तिला भेटण्यास बाणेर परिसरात आला. तरुणीने त्याच्या कुटुंबीयांबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने खोटी माहिती देवून तरुणीचा विश्वास संपादन केला. साईशने या तरुणीला त्याच्या एका मित्राने आर्थिक फसवणूक केल्याचे सांगितले. आपण लवकरच विवाह करणार आहोत, परंतु मी सध्या अडचणीत आहे, असे सांगून तरुणीकडून पैसे घेतले. त्यासाठी तरुणीने खासगी वित्तीय संस्थेकडून कर्जही घेतले.
मागील दीड वर्षात त्याने तरुणीकडून वेळोवेळी ३५ लाख २५ हजार रुपये घेतले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत बाणेर पोलिसांनी तपास करून साईशला ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल केकाण करीत आहेत. मागील काही दिवसांत विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून नोकरदार तरुणींना विवाहाच्या आमिषाने फसवणूक करण्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहेत.