- February 19, 2025
- No Comment
धक्कादायक! लग्नापूर्वी असलेल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

चाकण: लग्नापूर्वी असलेल्या प्रियकराच्या मदतीने मध्यरात्री झोपेत असलेल्या पतीवर चाकूने गळ्यावर, पोटावर वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी (ता.खेड) येथे घडला. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला अटक केली आहे.
सचिनकुमार उपेंद्र राजभर (वय 23, रा. जतपुरा, रोहतास, उत्तर प्रदेश) आणि अंकिता अजय कुमार सिंग (वय 26, रा. सावरदरी, जोंधळजाई मंदिराच्या शेजारी, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अजयकुमार सिंग (वय 28) असे पतीचे नाव आहे. त्याच्यावर पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अजयकुमार हे सुरीन अॅटोमोबाईल कंपनीत नोकरी करतात. त्यांची पत्नी अंकिता हिचे लग्नापूर्वी सचिनकुमार याच्याशी प्रेमसंबंध होते. हे पती अजयकुमारला माहिती होते. त्याने अंकिता हिला सचिनकुमार याच्याबरोबर बोलत जाऊ नको, असे सांगितले.
रविवारी(दि. 16) रात्री जेवण करुन अजयकुमार झोपले होते. मात्र, रुममध्ये कोणीतरी बोलत असल्याच्या आवाजाने रात्री साडेबारा वाजता त्यांना जाग आली. रुममध्ये अंकिता आणि सचिनकुमार आल्याचे त्याने पाहिले. अजयकुमारने त्यांना जाब विचारला असता दोघांनीही मारहाणीस सुरवात केली.
सचिनकुमारने अजयकुमारला जमिनीवर ढकलून देत त्याच्या डोक्यात दांडके मारले. त्यानंतर भाजी कापण्याची सुरी आणत गळ्यावर, पोटावर, छातीवर वार करुन त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. अजयकुमारने त्यांच्या ताब्यातून सुटका करत घराबाहेर धाव घेतली.
त्याचा आवाज ऐकुन लोक जमा झाले. लोकांनी खोलीला बाहेरुन कडी लावत अंकिता व सचिनकुमार यांना आतमध्ये डांबून ठेवले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. अजयकुमारला रुग्णवाहिकेतून संत तुकाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे महाळुंगे पोलिसांनी सांगितले.




