- March 4, 2025
- No Comment
संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली

पुणे: शहर आणि परिसरालगतचे महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त करण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिले पाऊल टाकले आहे. पीएमआरडीएसह अन्य शासकीय यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत तीन प्रमुख मार्गावरील २०१ अतिक्रमणे हटवित आहेत.
त्यामुळे २० हजार चौरस फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा झाला आहे. ही कारवाई महिनाभर सुरू ठेवण्यात येणार आहे.
शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला असून तीस दिवसांत रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत आणि अतिक्रमण केलेली दुकाने, गाळे, बांधकामे तसेच अन्य काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर विविध विभागांकडून संयुक्त कारवाई सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारपासून या संयुक्त कारवाईला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी तीन प्रमुख मार्गावरील २० हजार चौरस फुटांपेक्षा जास्त भागातील अतिक्रमणे काढून टाकण्यात आली.
पीएमआरडीए, पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक पोलीस, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य विभागांनी संयुक्त कारवाईसाठी वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार अतिक्रमण निष्कासन मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी संयुक्तपणे एकूण २०१ अतिक्रमणात २० हजार १०० चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. यात पुणे नाशिक रोडवरील इंद्रायणी नदी ते बर्गे वस्ती भागात ७८, पुणे सोलापूर रस्त्यावर ७० तर चांदणी चौक पौड रस्त्याच्या दोन्ही बाजूचे एकूण ५३ अतिक्रमणे काढण्यात आल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी- पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम,पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यकारी अभियंता शैलेजा पाटील, पुणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता सदानंद लिटके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी कारवाई केली.
कारवाईचा तपशील
१) पुणे नाशिक रोडवरील इंद्रायणी नदी ते बर्गे वस्ती भागातील ३ किलोमीटर अंतरात एकूण ७८ ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ७ हजार ८०० चौरस फूट मोकळे करण्यात आले
२) पुणे सोलापूर रस्त्यावरील १.५ किलोमीटर अंतरातील एकूण ७० ठिकाणी कारवाई करून एकूण ७००० चौरस फूटावरील अतिक्रमण काढण्यात आली.
३) चांदणी चौक पौड रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या साडेतीन किलोमीटर अंतरात ५३ ठिकाणी कारवाई करून ५ हजार ३०० चौरस फूटाचे अतिक्रमण काढण्यात आले.




