- March 5, 2025
- No Comment
वाहन चोरणारा अल्पवयीन मुलगा गजाआड, गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथकाची कारवाई

पुणे: राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने वाहन चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणले असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस अंमलदार अमित गद्रे, साईकुमार कारके, प्रदीप राठोड, इरफान पठाण, मनिषा पुकाळे यांनी केली.
वाहन चोरांना व त्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणी व गुन्हे शाखेच्या पथकांना पेट्रोलिंग व गस्त घालत ते गुन्हे उघड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक तीन मार्चला गस्तीवर असताना, एका अल्पवयीन मुलाबाबतची माहिती पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानूसार, माहितीची खातरजमा करण्यात आली. नंतर पथकाने माहितीनुसार सापळा लावून या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
दरम्यान त्यानंतर केलेल्या सखोल तपास आणि मुलाच्या घरझडतीत चोरीच्या एकूण ८ दुचाकी सापडल्या आहेत. त्याने या दुचाकी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि पर्वती व वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक दुचाकी चोरली आहे. त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी करत आहेत.




