- March 8, 2025
- No Comment
सायबर चोरट्यांनी लुबाडलेली ४३ लाखांची रोकड परत मिळवण्यात कोंढवा पोलिसांना यश
पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोंढव्यातील ज्येष्ठ नागरिकाची ४६ लाख ७५ रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात सायबर पोलिसांना ४३ लाखांची रक्कम ज्येष्ठास परत मिळवून देण्यात यश आले आहे.
सायबर चोरट्यांनी कोंढव्यातील एका ६३ वर्षीय सेवानिवृत्त बॅंक अधिकाऱ्यास मोबाईलवर संदेश पाठविला होता. त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवले. त्याला बळी पडून ज्येष्ठ नागरिकाने सायबर चोरट्यांच्या खात्यात काही रक्कम जमा केली. चोरट्यांनी सुरुवातीला त्यांना परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यामुळे ज्येष्ठाने वेळोवेळी चोरट्यांच्या बॅंक खात्यात ४६ लाख ७५ हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर चोरट्यांनी त्यांना कोणताही परतावा दिला नाही. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने नॅशनल सायबर क्राइमच्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान, ज्येष्ठाने सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केल्याचे आढळून आले. कोंढवा पोलिस ठाण्याच्या सायबर विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहसीन पठाण, राहुल शितोळे, अश्विनी सावंत यांनी तक्रारदाराच्या आर्थिक व्यवहाराची माहिती घेतली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून चोरट्यांच्या खात्यातील ४३ लाख रुपये त्वरित गोठविण्याची विनंती केली. न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम ज्येष्ठ नागरिकाच्या बॅंक खात्यात परत मिळवून देण्यात आली.
अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) रउफ शेख, सहाय्यक निरीक्षक मयूर वैरागकर, अरुण किटे, लवेश शिंदे यांनी ही कारवाई केली.
सेवानिवृत्त बॅंक अधिकाऱ्याकडून ऑनलाइन तक्रार प्राप्त होताच कोंढवा पोलिस ठाण्यातील सायबर विभागाने तातडीने प्रयत्न केले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ४५ दिवसांत ज्येष्ठ व्यक्तीस परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले.