- March 8, 2025
- No Comment
रक्तचंदन तस्करीचे दुबई कनेक्शन आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे स्पष्ट, आणखी तीन आरोपी अटक
पिंपरी: तब्बल साडे अकरा टन वजनाच्या साडे आठ कोटी रुपये किमतीच्या रक्त चंदन तस्करी प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने आणखी तिघांना अटक केली आहे.
या आरोपींकडून नवीन माहिती समोर आली आहे. हे रक्तचंदन दुबई येथे पाठवले जाणार असल्याचे समोर आल्याने रक्त चंदन तस्करीत आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्रीकांत शंकर भिलारे (वय ३८, रा. सानपाडा, नवी मुंबई), इंद्रावन बाबाजी माने (वय ३४, रा. कामोठे, नवी मुंबई), दीपक पोपट साळवे (वय ४२, रा. पारनेर, अहिल्यानगर) अशी गुरुवारी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर राजाराम गंगाराम गायखे (वय ३७ रा. काळेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) व हरप्रितसिंग धरमसिंग बदाना (वय ४२, रा. बिराज रेसिडेन्सी वेस्ट ठाणे) यांना यापूर्वीच अटक केली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेली माहिती अशी, रविवारी (ता. २) पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे पोलिसांनी एका कंटेनरमधून ११ टन ४९० किलोग्रॅम वजनाचे ८ कोटी ६१ लाख ७५ हजार किमतीचे रक्तचंदन जप्त केले. अवैधरीत्या रक्त चंदनाची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गायखे व बदाना यांना अटक करून अधिक तपास सुरु केला.
दरम्यान, हे रक्तचंदन दक्षिण भारतातून आले असून, ते खेड शिवापूर येथे उतरविल्याचे समोर आले. तसेच हे रक्तचंदन जेएनपीटी येथे आणण्यासाठी गायखे व बदाना हे जेएनपीटी येथून कंटेनर घेऊन खेड शिवापूर येथे आले. तिथे कंटेनरमध्ये रक्तचंदन भरून ते जेएनपीटीपर्यंत नेवून पुढे पाठविण्याचे नियोजन भिलारे, माने व साळवे हे करीत होते. हे रक्त चंदन जेएनपीटी येथून जहाजमार्गे दुबईला पोहोचविण्याचे नियोजन होते. मात्र, त्या आधीच पोलिसांनी कारवाई करून दोघांना रक्तचंदनासह ताब्यात घेतले. या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.