- March 8, 2025
- No Comment
उरुळी कांचन परिसरात दुचाकीस्वार तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
उरुळी कांचन : उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांनी एका ३२ वर्षीय तरुणावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे-उरुळी कांचन रोडवरील चिंतामणी वॉशिंग सेंटरजवळ सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
निखिल एकनाथ खेडेकर (वय ३२ , खाजगी नोकरी रा. शिंदवणे खेडेकर आळी, ता. हवेली) असे या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
खेडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुचाकीवरून आलेल्या तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरुळी कांचन परिसरात दहशत, गुंडगिरी, दादागिरी, कोयतेगिरी, छेडछाड, बुलेट फटाका आवाज अशा प्रकारात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे प्रकार सातत्याने घडत राहिले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल खेडेकर व त्यांचा मित्र सतीश चंद्रकांत वाघमोडे (रा. शिंदवणे) हे दोघेजण बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शिंदवणे येथून उरुळी कांचनकडे निघाले होते. यावेळी शिंदवणे बाजूकडून अज्ञात तिघेजण हे दुचाकीवर पाठीमागून आले. यातील मध्यभागी बसलेल्या इसमाने निखिल खेडेकर याच्या डोक्यात कोयत्याने हल्ला केला.
दरम्यान, या हल्ल्यात निखिल खेडेकर हा जखमी झाला. तर मोटार सायकलवरील तिघांपैकी एकाने फिर्यादी खेडेकर याला शिविगाळ करुन त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल घेऊन ते तिघे पसार झाले. याप्रकरणी जखमी खेडेकर यांनी अज्ञात तिघांविरुद्ध उरुळी कांचन पोलिसांत फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.