- November 2, 2025
- No Comment
तंबाखूयुक्त हुक्का पार्लरवर बंदी आदेश धुडकाविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा
पुणे : ‘राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातील आहे.मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात हर्बल हुक्क्याला परवानगी आदेश दिला आहे. मात्र, हर्बल हुक्क्यासह तंबाखूयुक्त हुक्का पार्लरवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेश धुडकाविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी दिला.
मुंबई उच्च न्यायालयाने १४ ऑक्टोबर रोजी शहरातील रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये तंबाखूविरहित हर्बल हुक्का देण्यास काही अडचण नाही. मात्र, तंबाखूजन्य हुक्का पार्लर चालविण्यास बंदी असल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत मुंबईतील काही रेस्टॉरंट चालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेस्टॉरंट आणि बार मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी
शुक्रवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली.मुंबई उच्च न्यायालयाने हर्बल हुक्का पार्लरला परवानगी दिली असून, पुण्यातही हर्बल हुक्का पार्लर चालविण्यास परवानगी देण्याची मागणी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली. ‘पुणे शहरात तंबाखूजन्य किंवा हर्बल हुक्का पार्लर चालविण्यास परवानगी नाही. हॉटेल, बार, रेस्टॉरंट चालकांनी हुक्का पार्लर चालवू नये. आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्यात येईल’, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. ‘शहरातील पबचालकांनी नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. अल्पवयीनांना मद्य विक्री करू नये. तसेच, मध्यरात्री दीडपूर्वी पब बंद करावेत’, असे आदेश पोलीस आयुक्तांनी पुन्हा दिले.