- November 5, 2025
- No Comment
कॉल रेकॉर्डिंग पतीला पाठवण्याची धमकी देत एक लाख ९५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकारणी एकाला अटक
पिंपरी : महिलेसोबत प्रेम असल्याचे बोलून त्याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग पतीला पाठवण्याची धमकी देत महिलेकडून एक लाख ९५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार चिखलीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बिमल उर्फ निशांत मोतीलाल पांडे (वय २५, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी बिमल यांची ओळख आहे. बिमल याने महिलेला दूरध्वनी करून तसेच प्रत्यक्ष भेटून त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. मात्र, महिलेने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर बिमल याने महिलेसोबत बोलतानाचे संभाषण ध्वनिमुद्रित तिच्या पतीला पाठवण्याची तसेच समाज माध्यमावर प्रसारित करण्याची करण्याची धमकी दिली. पैशांची मागणी करत पैसे न दिल्यास फिर्यादी महिला आणि तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देत महिलेकडून ऑनलाइन माध्यमातून एक लाख ९५ हजार रुपये खंडणी घेतली. चिखली पोलीस तपास करत आहेत.