- November 6, 2025
- No Comment
पुणे 4 वर्षे फरार असलेला गजा मारणेचा साथीदार सुनिल बनसोडेला वारजे पोलिसांकडून अटक

पुणे : गज्या मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यावर मुंबई पुणे रोडवर रॅली काढण्यात आली होती. रॅलीत सहभागी झालेल्या गजा मारणेच्या गुंडांवर पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलीसांनी विविध गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी गज्या मारणेचा राईटहँड सुनिल नामदेव बनसोडे हा फरार झाला होता. वारजे पोलिसांनी त्याला काल अटक केली.
तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर १५ फेब्रुवारी २०२१ रोजी गजा मारणे याने रॅली काढली होती. त्यात गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गजा मारणे याने वडगाव मावळ न्यायालयात हजर राहून जामीन मिळविला होता. याच गुन्ह्यात रुपेश मारणे, सुनिल बनसोडे व इतरांनी अटक पूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गजा मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली होती. रॅलीमध्ये वापरलेल्या महागड्या गाड्या जप्त केल्या होत्या. यावेळी सुनिल नामदेव बनसोडे हा फरार झाला, तो अद्याप पोलिसांना सापडला नव्हता. सुनिल बनसोडे हा वारजे येथे असल्याची माहिती वारजे पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली.




