- November 8, 2025
- No Comment
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहारात गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे रद्द

पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका जमीन व्यवहारात गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे सदर व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘ॲमेडिया कंपनी’ने हा व्यवहार केला होता. हा व्यवहार रद्द झाल्यानंतर पार्थ पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कारण या प्रकरणी कंपनीला मुद्रांक शुल्क आणि दंडासह सुमारे 43 कोटी रुपये भरावे लागणार आहेत.
‘ॲमेडिया कंपनी’ने कोरेगाव पार्क येथील जमिनीचा व्यवहार केला होता. परंतु, हा व्यवहार वादग्रस्त ठरल्याने तो रद्द करण्यात आला. या व्यवहारात मुद्रांक शुल्काची फसवणूक झाल्याचं उघड झालं असून नोंदणी मुद्रांक विभागाने कंपनीला दस्त नोंदणीवेळी बुडवलेले व दस्त रद्द करण्यासाठीचे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरण्याची सूचना केली आहे. त्यानुसार, कंपनीला सुमारे 43 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. यात 42 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि त्यावर दोन टक्के दंड यांचा समावेश आहे. त्यामुळे व्यवहार रद्द झालेला असतानाच पार्थ पवार यांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर, पुण्याच्या नोंदणी मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती लवकरच पूर्ण होईल.




