- November 10, 2025
- No Comment
मागील ३२ वर्षांपासून बेकायदा दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करीत असलेल्या डॉक्टरला अटक

पुणे : भवानी पेठेतील कासेवाडी भागात बेकायदा दवाखाना चालविणाऱ्या तोतया डॉक्टरला खडक पोलिसांनी अटक केली. वैद्यकीय पदवी नसताना हा तोतया डॉक्टर मागील ३२ वर्षे दवाखाना चालवून रुग्णांवर उपचार करीत होता. त्याच्याविरोधात मे महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरारी झाला होता. न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
डॉ. प्रमोद राजाराम गुंडू (वय ५७) असे तोतया डॉक्टरचे नाव आहे. वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा व्यवसाय करणाऱ्या तोतया डॉक्टरांविरुद्ध महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत कासेवाडी भागात प्रमोद गुंडू बेकायदा दवाखाना चालवीत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाणून पाहणी केली असता, गुंडू याने वैद्यकीय पदवी घेतली नसल्याचे; तसेच वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीही केली नसल्याचे उघड झाले
गुंडू मागील ३२ वर्षांपासून बेकायदा दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करीत होता. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात मे महिन्यात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून तो फरारी झाला होता.
त्याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी शिवाजीनगर येथील पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने तो फेटाळल्यावर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. दरम्यान, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. खडक पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक जयसिंग दाढे यांच्या पथकाने त्याला जेरबंद करून न्यायालयासमोर हजर केले. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली




