- November 10, 2025
- No Comment
फुरसुंगी परिसरात धक्कादायक प्रकार अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक आणि लैंगिक अत्याचार

पुणे : पुणे शहरात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असल्याचं चित्र आहे. अशातच अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक आणि लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार फुरसुंगी परिसरात उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेचे खाजगी फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले आणि नंतर ते फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिनेश राठोड (वय 24) या तरुणाविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुरसुंगीतील अल्पवयीन मुलीशी आरोपीची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर त्याने तिला प्रेमाचे आमिष दाखवले आणि लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. नंतर आरोपीने पीडितेला आपल्या घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या दरम्यान विकृत तरुणाने तिचे खाजगी फोटो व व्हिडिओ काढले होते. यानंतर आरोपीने सदर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेकडून तब्बल 1 लाख 15 हजार रुपये उकळले. मात्र नंतरही आरोपीकडून तिला वारंवार पैशाची मागणी होऊ लागली. अखेर त्याला कंटाळून पीडितेने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे नराधम आरोपीने पीडित तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून, तसंच तिच्या भावाच्या फेसबुक अकाउंटवरून खासगी फोटो आणि व्हिडिओ शेअर केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पीडितेच्या कुटुंबाला ही समजताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. फुरसुंगी पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे




