- November 11, 2025
- No Comment
हौस म्हणून पिस्टल बाळगणार्या दोन तरुणांना खंडणी विरोधी पथकाने केले ज अटक; एक 1 पिस्टल व 1 जिवंत काडतुस केले जप्त

पुणे : हौस म्हणून पिस्टल बाळगणार्या दोघा तरुणांना खंडणी विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून १ पिस्टल व १ जिवंत काडतुस जप्त केले आहे.
रवींद्र लक्ष्मण रसाळ (वय २१, सध्या रा. सदाशिव पेठ, मुळ रा. मु़ चिरेमोडी, पो. गुंजवणे, ता. वेल्हा) आणि अथर्व अभिमन्यू शेजवळ (वय २०, रा. शिवांशु अपार्टमेंट, आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघेही जण सदाशिव पेठेत नोकरी करतात. त्यांनी शौक म्हणून ६ महिन्यांपूर्वी पिस्टल विकत घेतले होते. त्यांना पिस्टल विक्री करणारा सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार मयुर भोकरे व मंगेश गुंड यांना ९ नोव्हेंबर रोजी त्याचे बातमीदारांकडून माहिती मिळाली की, रवी रसाळ याच्याकडे गावठी पिस्टल असून तो नदीपात्रात वर्तक बागेच्या मागील बाजूस आला आहे. ही बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना कळविली. पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे वर्तक बागेजवळ आले. त्यांनी नदीपात्रात उभ्या असलेल्या रवी रसाळ याला पकडले. त्याच्याकडे पिस्टलबाबत चौकशी केल्यावर त्याने पिस्टल अथर्व शेजवळ याच्याकडे ठेवण्यास दिले आहे. त्यानंतर पोलिसांनी आंबेगाव पठार येथील घरातून अथर्व शेजवळ याला पकडून त्याच्याकडून पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार अमोल आवाड, दुर्योधन गुरव, बाला रफी शेख, रहिम शेख, मयुर भोकरे, मंगेश गुंड यांनी केली आहे.




