- November 12, 2025
- No Comment
पिरंगुटमध्ये गोळीबार, दोघांना अटक

पुणे : पिरंगुट येथील सावकारवाडी येथे पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीमध्ये झालेल्या वादात पिरंगुटमध्ये फक्त माझीच चालणार असे म्हणून गुंडाने तरुणावर गोळीबार करुन त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ओंकार ऊर्फ सनी गोळे (वय २५, रा. पिरंगुट, ता. मुळशी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करुन गोळी काढण्यात आली आहे.
याबाबत परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक अनिल भिमराव बत्तिशे (वय २९) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सागर ऊर्फ ऋषिकेश संभाजी गोळे (वय ३१, रा. पिरंगुट) आणि महेश तानाजी कदम (वय २४, रा. पिरंगुट) यांना अटक केली आहे. शुभम संभाजी गोळे, संकेत सोनावणे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पिरंगुटमधील सावकारवाडी येथील सनी गोळे याच्या गोठ्यावर ९ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर गोळे याने सावकारवाडी येथील ओंकार ऊर्फ सनी गोळे याच्या गोठ्यावर पार्टीचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी जन्मेजय जगताप, सनी संभाजी गोळे, सागर ऊर्फ ऋषिकेश संभाजी गोळे, शुभम संभाजी गोळे, महेश तानाजी कदम, संकेत सोनावणे, स्वराज म्हसकुटे हे हजर होते सर्व मिळून गप्पा मारत होते. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सनी गोळे याचे शुभम गोळे, संकेत सोनवणे, सागर गोळे आणि महेश कदम यांच्याबरोबर दारु पिण्यावरुन शाब्दिक वाद सुरु झाले. त्यानंतर त्यांची भांडणे जोरजोरात झाली. त्यांनी सनी गोळे याला हाताने मारहाण करायला चालु केली. तेव्हा शुभम जोरजोरात मारा रे सनीला असे म्हणून सर्व जण मिळून सनी गोळेला मारहाण करु लागले. शुभम हा सनी गोळे याला मोठ्याने शिवीगाळ करुन लागला. शुभम गोळे याने पिरंगुटमध्ये फक्त माझीच चालणार, असे वारंवार मोठमोठ्याने ओरडून सांगत होता.
त्यावर सनी गोळे याने त्याला शिवीगाळ करायला लागला. तेव्हा शुभम गोळे याने गावठी कट्टा काढून त्यातून सनी गोळेच्या दिशेने एक गोळी फायर केली. ही गोळी सनी गोळे याच्या पोटात घुसली. ते पाहून शुभम गोळे, संकेत सोनवणे हे पळून गेले. इतरही जण घाबरुन तेथून पळून गेले. ऋषिकेश गोळे याने सनी गोळे याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शुभम गोळे, महेश कदम, संकेत सोनवणे आणि सागर गोळे यांच्या दहशतीमुळे नेमका झालेला हा प्रकार सुरुवातीला कोणी सांगण्यास तयार नव्हता. सनी गोळे याच्यावर शस्त्रक्रिया झाली व त्याची प्रकृती सुधारत असल्याचे समजल्यावर पळून गेलेले जन्मेजय जगताप याने ही हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर मग पोलीस उपनिरीक्षक बत्तिशे यांनी स्वत: फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.




