- November 12, 2025
- No Comment
नीलेश घायवळ टोळीवर तिसरा मोक्का

पुणे : नीलेश घायवळ टोळीवर पुणे पोलिसांनी तिसर्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. याप्रकरणी खंडणीचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
कर्वेनगर, शिवणे परिसरातील नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ आणि वाहतूक सेवा पुरविणार्या एका खासगी कंपनीच्या संचालक महिलेकडून घायवळ टोळीने तब्बल ४४ लाख ३६ हजार रुपयांची खंडणी उकळली होती. याप्रकरणी नीलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन घायवळ तसेच त्या शाळेतील क्रीडा शिक्षकासह १३ जणांवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
त्यात बापू कदम, नीलेश घायवळ, सचिन घायवळ, पप्पू दळवी, अभि गोरडे, दीपक आमले, बाबु वीर, अमोल बंडगर, बापू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबुल गोळेकर आणि बबलु सुरवसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या महिला फिर्यादी एका संस्थेच्या शाळेच्या कॅन्टींनला खाद्यपदार्थ पुरवितात. शाळेतील क्रीडा शिक्षक बापू कदम याने माझी कोथरुड भागात डेअरी आहे. तुम्ही आमच्याकडून पनीर, दुध खरेदी करा, असे सांगितले. त्यांच्याकडून २२ लाख रुपये घेऊन दुध किंवा पनीर पुरविले नाही. त्यानंतर महिलेने विचारणा केल्यावर त्याने मी नीलेश घायवळ टोळीसाठी काम करत आहे. घायवळचा भाऊ सचिन हा क्रीडा शिक्षक आहे. तुम्हाला या वर्षीपण कॅन्टींनला माल पुरवायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, अन्यथा तुमचा व्यवसाय बंद पाडु अशी धमकी देऊन त्यांच्याकडून एकूण ४४ लाख रुपयांची खंडणी उकळली होती.
नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर या अगोदर कोथरुडमध्ये गोळीबार करुन तरुणाला जखमी केल्याबद्दल दाखल खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे.
कोथरुडमधील मुठेश्वर मंदिराजवळ गोळीबार केल्यानंतर काही अंतरावर या टोळीने एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणातही पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यानंतर आता खंडणीच्या गुन्ह्यात तिसरा मोक्का लावण्यात आला आहे.




