- November 16, 2025
- No Comment
हिंजवडीतील दोन बनावट कॉल सेंटरवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखा आणि युनिट २ च्या पथकाने छापा घालून २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : अमेरिकन नागरिकांना फोन करुन त्यांना औषध कंपन्यांविरोधात कोर्टात जाण्यासाठी व त्यामधून चांगली नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून माहिती घेऊन ती माहिती अमेरिकेतील लॉ फर्मला दिली जात असे. या लॉ फर्मकडून डॉलर स्वरुपात रक्कम प्राप्त करण्यात येत होती. तसेच त्यांना गिफ्ट व्हाऊचर गळ्यात मारुन फसवणुक करणार्या हिंजवडीतील दोन बनावट कॉल सेंटरवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखा आणि युनिट २ च्या पथकाने छापा घालून २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्काय हाय सोल्युशन कंपनीचे मालक सागर कुमार यादव (वय ३२, रा. हिंजवडी फेज २) आणि मॅनेजर आनंद पंकज सिन्हा (वय २८, रा. वृंदावन सोसायटी, वाघोली) यांना अटक करुन कॉलसेंटरमध्ये काम करणार्या ७ जणांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्या छाप्यामध्ये टेक लॉ सोल्युशन (रा. गेरा इम्पेरियल, हिंजवडी फेज २) या कॉलसेंटरचे मालक धनंजय साहेबराव कासार (वय २५, रा. माण, ता. मुळशी) आणि मॅनेजर हर्षद शंकर खामकर (वय २८, रा. गौतम पी जी सेल पेट्रोल पंपाजवळ, हिंजवडी) यांना अटक करुन इतर आरोपींकडे चौकशी करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना हिंजवडी भागात वेगवेगळे बनावट कॉल सेंटर असल्याची माहित मिळाली. त्यानुसार सायबर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट २ यांची दोन पथके तयार करण्यात आली.
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व पथकाने स्काय हाय सोलुशन या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला. तेथे कॉल सेंटरचे मालक, मॅनेजर व त्यांचे ७ कर्मचारी वेगवेगळ्या संगणकावर व लॅपटॉपवर हेडफोन लावून टेलिसीएमआय, डायलर तसेच पॉऊड या सॉफ्टवेअरचा वापर करुन अमेरिकेतील नागरिकांशी वेगवेगळ्या सुडो नावाचे इंग्रजीमध्ये अमेरिकेतून मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून राऊंडअप, झानटॅक औषधे, टाल्कम पावडर इत्यादीच्या वापरामुळे त्यांना कॅन्सर, नॉन हॉकिंग लिंफोमा, ब्लड कॅन्सर अशा प्रकारचे गंभीर रोग होतात, असे सांगून अशा प्रकारे ही औषधे व टाल्कम पावडर वापरणारे तसेच त्यांचे पैकी असे गंभीर आजार असलेल्यांची कॉलद्वारे माहिती घेतली जात असे. तसेच त्यांना राऊंड अप पेस्टीसाईस, झानटॅक या औषध कंपनी विरोधात कोर्टात जाण्यासाठी व त्यामधून चांगली नुकसान भरपाई मिळवून देण्याचे अमिष दाखवून त्यांची माहिती अमेरिकेतील लॉ फर्मला दिली जात असे. त्यानंतर या लॉ फर्मकडून डॉलर स्वरुपात रक्कम प्राप्त करण्यात येत होती.
तसेच अमेरिकेतील लोकांना कम्युनिटी चॉइस फायनासियल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून लिंकद्वारे त्यांचे बँक डिटेल्स, युजर आयडी, पासवर्ड इत्यादी माहिती घेऊन त्यांना त्यांचा क्रेडिट स्कोर खराब असल्याचे सांगून तो चांगला करुन देण्यासाठी गिफ्ट व्हाऊचर, डॉलरच्या माध्यमातून रक्कम घेत असल्याची माहिती प्राप्त झाली. कॉलसेंटरमध्ये असलेले इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेस, संगणक, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे.
दुसरी कारवाई टेक लॉ सोलुशन या कॉल सेंटरवर करण्यात आली. या कॉल सेंटरमध्ये बेलटॉक या अॅपद्वारे त्यांच्या स्वत:च्या नावाचा वापर न करता त्यांच्या कॉल सेंटरचा मालक धनंजय कासार याने दिलेल्या सुडोनेमचा वापर करुन अमेरिकेतील नागरिकांना मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगितले जात होते. राऊंड अप पेस्टीसाईड, पॅराकॉट पेस्टीसाईड, टॅलकम पावडर, रोबलॉक्स, सोलर पॅनल हे प्रोडक्ट त्यांनी वापरले आहेत का, केले असेल तर त्याचा प्रुफ आहे का, त्या प्रोडक्टचा साईड इफेक्ट झाला का असे विचारुन त्यांची माहिती घेऊन ती अमेरिकेतील लॉ फर्मला पुरवून कमिशन स्वरुपात पैसे कमावित असल्याचे निष्पन्न झाले आहे. कॉल सेंटरमध्ये वापरण्यात येणारे संगणक, लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रॉनिक माल जप्त केला असून कॉल सेंटर मालक धनंजय कासार व मॅनेजर हर्षद खामकर यांना अटक केली आहे. या सर्व आरोपींना १८ नोव्हेबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. छापा कारवाईदरम्यान एकूण २० हार्डडिस्क, ३ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार, त्यांच्याकडील पोलीस अंमलदार व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस, इतर पोलीस अंमलदारांनी केली आहे. सरकारी अभियोक्ता सुरज मोहिते यांनी न्यायालयात बाजू मांडून पोलीस कोठडी मिळविण्यास सहाय्य केले.




