- November 23, 2025
- No Comment
पिंपरी-चिंचवड गेल्या ११ महिन्यांत देहविक्रय व्यवसाय सुरू असलेल्या २६ ठिकाणी छापे त्यामध्ये ४२ आरोपींना अटक केली असून, ५५ पीडित महिलांची सुटका
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने गेल्या ११ महिन्यांत देहविक्रय व्यवसाय सुरू असलेल्या २६ ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये ४२ आरोपींना अटक केली असून, ५५ पीडित महिलांची सुटका केली, तर चार ठिकाणे सील केली.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत रहिवासी हॉटेल व मसाज पार्लर, स्पा अशा ठिकाणी अवैधरीत्या चालणाऱ्या देहविक्रय व्यवसायाविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षामार्फत कारवाई करण्यात येत आहे. गेल्या ११ महिन्यांत २६ ठिकाणी छापे टाकून पिटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
सहा मसाज पार्लर, स्पा, सात हॉटेल, तीन रहिवासी सदनिका अशी ठिकाणे आणि ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली. २६ गुन्ह्यांमध्ये ४२ आरोपींना अटक केली असून, ५५ पीडित महिलांची सुटका केली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक रस्त्यावर उभे राहून अश्लील हातवारे करणाऱ्या ९७ महिलांविरुद्ध ६५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी फाट्याजवळील एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकला. पाच पीडित महिलांची सुटका केली. लॉजचालक गजानन सटवाजी आव्हाड (वय २८, रा. आळंदी) याच्यावर चाकण ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली असल्याचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी सांगितले. पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २२ पोलीस ठाणे आहेत. आयुक्तालयाची भौगोलिक हद्द मोठी आहे. आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षामार्फत नियमितपणे कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.