- November 25, 2025
- No Comment
स्वतःला गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून व्यावसायिकाकडून ४५ हजार रुपये उकळली खंडणी

पिंपरी : म्हाळुंगे इंगळे परिसरात एका हॉटेलमध्ये पाचजणांनी घुसून दमदाटी केली. स्वतःला गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून ४५ हजार रुपये खंडणी घेतली. तसेच दोन लाख रुपयांची मागणीही केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करत पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भारत चंद्रकांत ओव्हाळ (२९, लक्ष्मी चौक, हिंजवडी), पांडुरंग तुकाराम साळुंके (३२, वडगाव बुद्रुक, पुणे), कल्पेश संजय खैरनार (२९, मोशी), कृष्णा उर्फ किशोर काळे (३१, गोडाऊन चौक, मोशी), किरण शशिकांत लोखंडे (३३, शरदनगर, मोशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत संबंधित हॉटेल मालकाने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेलचे शटर खाली ओढून आत येऊन गिऱ्हाईकांना बाहेर काढले. फिर्यादी यांना आत टाकण्याची धमकी दिली. तसेच आरोपी पांडूरंग साळुंके याने आपण गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी असल्याचे सांगत दोन लाख रुपयांची मागणी केली. एटीएममधून ४५ हजार रुपये काढून आरोपींना देण्यास भाग पाडले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत




