- November 27, 2025
- No Comment
पुण्यात गुंगीचं औषध पाजून महिलेकडून पुरुषावर अत्याचार
पुणे : शहरात एक धक्कादायक घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. महिलेने पुरुषावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी कोथरूड पोलिसात एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका महिलेनं कोल्हापूर येथील एका पुरुषाला गुंगीचं औषध देत त्याचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याचीही माहिती पुढे आली आहे. आरोपी महिलेचे नाव गौरी वांजळे असे असून, ती स्वतःला वकील असल्याची बतावणी करीत पीडितेला सतत धमक्या देत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मूळची कोल्हापूरची असल्याचे समजते. तिने काही वैयक्तिक कारणांमुळे तक्रारदार पुरुषाशी संपर्क वाढवला. त्यानंतर एका भेटीदरम्यान महिलेने त्या पुरुषाला खाद्यपदार्थात गुंगीचे औषध मिसळून दिले. औषधाचा परिणाम झाल्यानंतर त्या पुरुषावर बळजबरीचे प्रयत्न करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. एवढेच नाही, तर त्याच्या अश्लील अवस्थेत फोटो आणि व्हिडिओ घेतले गेले. त्यांचा वापर करून आरोपी महिलेकडून वारंवार पैसे मागितले जात होते, अन्यथा हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती.
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पीडित व्यक्तीच्या घरीही आरोपी महिलेनं जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असल्याची नोंद आहे. तक्रारदाराने सांगितले की, महिलेनं बळजबरीने त्याला काशी विश्वनाथ परिसरात घेऊन जाऊन तिथेही अत्याचाराचा प्रयत्न केला. मानसिक छळ, दमदाटी आणि आर्थिक ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त झाल्यानंतर शेवटी पीडित व्यक्तीने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली.