- November 27, 2025
- No Comment
दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २० लाख ४० हजार रुपयांची फसवणूक
पिंपरी : दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २० लाख ४० हजार रुपयांची टोळक्याने फसवणूक केली. ही घटना १२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भोसरी येथे घडली.या प्रकरणी ४३ वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांनी ‘गुंतवणूक केलेल्या रकमेचे २० महिन्यांत दामदुप्पट करून देतो,’ अशी आकर्षक योजना सांगितली. त्यांनी फिर्यादीला पैसे गुंतवण्यासाठी भाग पाडले आणि एका आरोपीच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे १५ लाख रुपये आणि रोख स्वरुपात ३ लाख रुपये, असे एकूण १८ लाख रुपये स्वीकारले. गुंतवणुकीच्या बदल्यात आरोपीची बनावट स्वाक्षरी असलेले दोन धनादेश फिर्यादीला दिले. करारनाम्यात नमूद केल्यानुसार गुंतवलेल्या रकमेवर प्रतीमहिना आठ टक्के दराने परतावा दिला नाही. तसेच, ३६ लाख रुपये दामदुप्पट रक्कम न देता, गुंतवलेल्या रकमेपैकी केवळ १५ लाख ६० हजार रुपये परत केले आणि फिर्यादीची २० लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.