- December 11, 2025
- No Comment
पुणे विमानतळावर प्रवाशाकडून दोन कोटी २९ लाख रुपयांचा गांजा जप्त

पुणे : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर हाय्डोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या एका प्रवाशाला सीमाशुल्क विभागाच्या पथकाने पकडले. प्रवाशाकडून दोन कोटी २९ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. बँकाँकहून पुणे विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाने त्याच्याकडील सामानात गांजा लपविला होता.
विमानतळावर ८ डिसेंबर रोजी बँकाँकहून आलेल्या विमानातून एक प्रवासी उतरला. तो घाईघाईत विमानतळावरून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. कस्टमच्या पथकातील अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत हायड्रोपोनिक गांजा सापडला. त्याच्याकडून दोन हजार २९९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. हायड्रोपोनिक गांजाची लागवड नियंत्रित वातावरणात केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात नियंत्रित वातावरणात लागवड करण्यात आलेल्या गांजाची किंमत मोठी असते. पुणे विमानतळावर प्रवाशाकडून जप्त केलेल्या गांजाची किंमत दोन कोटी २९ लाख रुपये असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रवाशाने बँकांँकहून गांजा आणल्याची माहिती कस्टच्या पथकाला चौकशीत दिली. तो गांजा कोणाला देणार होता ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. हायड्रोपोनिक गांजा तस्करी करण्याचे प्रकार वाढले आहेत. यापार्श्वभूमीवर कस्टमच्या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशाविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.




