- September 21, 2022
- No Comment
कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
म्हाळुंगे: कंटेनरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना तळेगाव-चाकण रोडवर म्हाळुंगे येथे घडली.
अभिमन्यू केशव प्रधान (वय 36, रा. लांडेवाडी, भोसरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रामेश्वर अच्युतराव हळदे (वय 51, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालक भुलन सितलाप्रसाद बिंद (वय 42, रा. नवी मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हळदे आणि अभिमन्यू प्रधान हे महाळुंगे येथील के के इंटरप्रायजेस या कंपनीत काम करत होते. सोमवारी रात्री ते काम संपल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होते. तळेगाव-चाकण रोडने जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनर जोरात चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात अभिमन्यू हे कंटेनरच्या उजव्या चाकाखाली आल्याने चिरडले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करीत आहेत.