- September 21, 2022
- No Comment
महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
तळेगाव: वीजपुरवठा खंडित केल्याने कार्यालयात घुसून महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला तरुणाने बेदम मारहाण केली.
विक्रम गुलाब राठोड (वय 39, रा. ताथवडे) असे मारहाण झालेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार उर्फ विकी नवघने (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या तळेगाव-दाभाडे स्टेशन शाखा – 1 येथे फिर्यादी विक्रम राठोड हे सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. महिन्याभरापूर्वी आरोपीला वीजबिल चुकीचे आले होते. त्याला वीजबिल दुरुस्त करून दिले होते. त्यावेळी त्याने महावितरणच्या कार्यालयात येऊन शिवीगाळ केली होती. दरम्यान फिर्यादी यांनी आरोपीला वीजबिल भरण्याबाबत सांगितले होते. मात्र त्याने वीजबिल भरले नव्हते. त्यामुळे महावितरण कडून आरोपीचे वीज कनेक्शन कट केले.
त्या रागातून आरोपीने महावितरणच्या कार्यालयात येऊन सहाय्यक अभियंता राठोड यांना मारहाण केली. तू एफआयआर तर कर, मी नंतर येऊन तुला ठेचतो, अशी धमकी देखील आरोपीने दिली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत