- September 22, 2022
- No Comment
खेड:बेकायदा प्लॉटिंग पाडून काळा पैसा कमविण्याचा गोरखधंदा बंद करा,ग्रामपंचायती चे अवाहन
खेड: नागरिकांची फसवणूक आणि कुठल्याही सोयीसुविधा न देता केलेल्या बेकायदा प्लॉटिंग व्यवसायात अनेक राजकीय वरदहस्त असलेली मंडळी शिरली आहेत. त्यामुळे चाकण जवळील वाकी खुर्द (ता.खेड) ग्रामपंचायतीने ठराव करून अशा बेकायदा प्लॉटिंगला आळा घातला आहे.
चाकण आणि एमआयडीसीच्या चारही बाजूंच्या आठ-दहा किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत हद्दीत जोर धरलेल्या प्लॉटिंगच्या बेकायदा प्रकारांकडे महसूल प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. भूमाफियांसह दलालांनी सर्वत्र गुपचूप शेतजमिनीचे बेकायदा प्लॉटिंग पाडून काळा पैसा कमविण्याचा गोरखधंदा चालविला आहे. चाकण भागातील प्लॉटिंग दलालांनी महसूल प्रशासनातीलच अनेकांना हाताशी धरून डोंगर,टेकड्या, ओढ्यांमधील जमिनींचे आणि वादादित व इनामी जमिनींचे प्लॉटिंग चालविले आहे.
गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटून चौपट पाचपट दराने असे भूखंड बेकायदेशीरपणे विक्री केले जात आहेत. महसूल विभागातील मंडळीं देखील लालसेतून कायद्यातील पळवाटा दाखवत अशा नोंदी सातबारावर घेत आहेत. त्यामुळे वाकी खु. ग्रामपंचायतीने गावात ठिकठिकाणी फ्लेक्स लावून अशा बेकायदा प्लॉटिंग मध्ये गुंठा- अर्धा गुंठा जमिनी खरेदी करू नयेत असे आवाहन केले आहे.
पीएमआरडीए कडून नकाशा मंजुर करून आणि सर्व सुविधा देऊनच ग्रामपंचायत हद्दीत प्लॉटिंग करावे , अन्यथा या बाबत पीएमआरडीएला कळवण्यात येईल असा स्पष्ट इशारा बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्या मंडळीना दिला असल्याचे सरपंच अनुताई काळे, उपसरपंच प्रीती गायकवाड, माजी उपसरपंच संदीप जाधव, संतोष वहिले, सदस्य अमोल जाधव, मयूर परदेशी, मंगल जाधव आदींसह सर्व सदस्यांनी केले आहे.