- October 2, 2022
- No Comment
मावळातील सरपंच व ग्रामसेवक लाच घेताना रंगेहाथ अटक, लाचलुचपत विभागाची उल्लेखनीय कामगिरी
मावळ: कामशेत येथील कुसगाव खुर्दच्या सरपंच व ग्रामसेवकाला 8 हजार रुपयांची लाच घेत असताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाने कुसगाव ग्रामपंचायत कार्यालयात केली. मृत्यूप्रमाणपत्रासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
सरपंच अनिल बाळू येवले (वय़ 33 रा. कुसगाव) व ग्रामसेवक अमोल बाळासाहेब थोरात (वय 34) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने 26 सप्टेंबर रोजी चुलत आजोबाच्या मृत्यूनंतर त्याचे मृत्यूप्रमाणपत्र मिळावे म्हणून ग्रामपिंचायतीकडे अर्ज केला होता. मात्र, हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरपंच येवले याने तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 8 हजार रुपये देण्याचे ठरले. या लाज मागण्याला ग्रामसेवक थोरात याने सरपंच येवलेला प्रोत्साहन दिले. ठरल्यानुसार आठ हजारांची लाच घेत असताना ग्रामपंचायत कार्यालयातच लाचलुचपत विभागाने रंगेहात आरोपींना पकडले.
याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढिल तपास लाचलुचपत विभागाच्या पोलीस उप अधिक्षक सीमा आडनाईक करत आहेत.