- October 4, 2022
- No Comment
आर्थिक फसवणूक करून एकाचा खून
तळेगाव: नोकरीचे किंवा कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्याला फसवणूक झालेल्यांनीच मारहाण करत खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. नऱ्हे येथे एकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता. हा खून आर्थिक फसणूकीतून झाल्याचे पुणे पोलिसांनी अवघ्या दहा तासात उघड केले असून चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
महेश शंकरराव धुमाळ (वय 32 रा.शिरुर),शिवराज किशोर प्रसाद (वय 32 रा.वडगाव मावळ),शिवाजी रंगाप्पा तुमाले (वय 56 रा. फुरसुंगी),अक्षय पोपट आढाव (वय 22 रा.अहमदनगर) यांना अटक केली असून त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्ह दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनिल नलावडे हा शुक्रवारी नऱ्हे परिसरात त्याच्या ओळखीचे कुर्डेकर दांम्पत्य यांच्याकडे आला होता. याची खबर मिळताच आरोपी तेथे आलो व त्यांनी कुर्डेकर यांच्या घरातच नलावडे लाथाबुक्क्यांनी मारहाण कऱण्यास सुरुवात केली. त्याचे हातपाय बांधून ते त्याला बिल्डींगच्या पार्कींगमध्ये ओढत खाली घेऊन आले पार्किंगमध्येही त्याला बेदम मारहाण केली. यातच नलावडे याचा मृत्यू झाला. हे पाहून आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी कुर्डेकर यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, सुनील नलावडे याने आरोपींना मंत्रालय व मेट्रो विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दिले होते.
त्याचबरोबर तो अनेक महिलांना लोन मंजूर करुन देतो असेही आमिष दाखवायचा. सुनिल नलावडे याने फसवूणक केलेले अनेक जण गेल्या दीड वर्षापासून मागावर होते. त्यातूनच त्यांना तो नऱ्हे येथे येणार असल्याची खबर मिळाली व त्याचा आरोपींनी खून केला. हा गुन्हा पुणे पोलिसांच्या युनीट तीन ने उघडकीस आणला असून पोलिसांनी तळेगाव दाभाडे, अहमदनगर, फुरसुंगी, सिरापूर येथे पथके पाठवून आरोपींना अटक केले असून गुन्ह्यात वापरलेली 5 लाख 9 हजार रुपयांची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. याचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई गुन्हे शाखी तीनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अमंलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, रामदास गोणते, सुजित पवार, संजिव कंळबे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर यांनी केली आहे.