- October 6, 2022
- No Comment
तरुणीची फसवणूक, मॅट्रीमोनिअलवर अकाऊंट पडल महागात
देहू: मॅट्रीमोनिअल साईटवर ओळख झालेल्या व्यक्तीने अमेरिकेतून गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. ते गिफ्ट दिल्ली विमानतळावर कस्टममध्ये आले असून तिथून सोडविण्यासाठी पैशांची मागणी करत पावणे दोन लाखांहून अधिक रुपये घेत फसवणूक केली.
देहूरोड येथील तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी यश अग्रवाल, एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची यश अग्रवाल याच्यासोबत जीवनसाथी या वेडिंग साईटवर ओळख झाली होती. त्याने अमेरिकेतून गिफ्ट भारतात पाठवले असल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीला एका महिलेचा फोन आला. ती महिला दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बोलत असल्याचे सांगत त्यांच्यासाठी अमेरिकेतून गिफ्ट आले असून त्यात महागड्या वस्तू असल्याने ते घेण्यासाठी कस्टम चार्ज भरावा लागेल असे सांगितले.
फिर्यादीने कस्टम चार्जच्या नावाखाली नाजीर अहमद नावाने असलेल्या बँक खात्यात 38 हजार 500 रुपये पाठवले. काही वेळाने तरुणीला पुन्हा फोन आला. त्या गिफ्टमध्ये 20 हजार अमेरिकन डॉलर आहेत, त्यामुळे त्याचे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून एक लाख 48 हजार रुपये भरावे लागतील, असेसांगितले. फिर्यादींनी ते पैसे सैफ खान या नावाने असलेल्या खात्यात दोन टप्प्यात भरले. पैसे घेऊन तरुणीला गिफ्ट न देता फसवणूक केली. काही दिवस तरुणीने गिफ्ट येण्याची वाट पाहिली. मात्र गिफ्ट न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली.
देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.