- October 7, 2022
- No Comment
फेसबुक फ्रॉड, लोन देणार सांगुन आठ लाखाला घातला गंडा
दत्तवाडी: फेसबुकवरून एक ते दोन तासाच लोन मिळवून देतो म्हणून नागरिकांना गंडा घालणाऱ्या आरोपीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे आरोपीने आत्तापर्यंत 200 नागरिकांची सुमारे 7 ते 8 लाखांची फसवणूक केली आहे.
विठ्ठल बाबु जरांडे (वय33 रा.उरळी देवाची, मुळ-पांराडा, उस्मानाबाद) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो या नावाने ऑक्टोबर 2020 पासून फेसबुकवरून आपले पेज चालवत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आरोपी हा त्याच्या फेसबुक पेजवरून एक ते दोन तासात कर्ज मिळवून देण्याची जाहिरात करत होता. यात त्याने त्याचा संपर्क क्रमांकही टाकला होता. कर्जाच्या चौकशीसाठी फोन केला असता तो गरजू नागरिकांना त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, कॅन्सल चेक याचे फोटो पाठवायला सांगायचा, यात प्रोसेसिंग फीस म्हणून 1 हजार 250 रुपये व लोन मंजुरीचे कमिशनम्हणून 4 ते 5 हजार रुपये ऑनलाईन पेमेंट करून घ्यायचा.त्यानंतर कर्ज मंजूर न करता नागरिकांचा नंबर ब्लॉक करून फसवणूक करायचा. त्याने केवळ पुणेच नाही तर राज्यातील सुमारे 200 नागरिकांना 7 ते 8 लाखांचा गंडा घातल्याचा अंदाज आहे.
याबाबत पोलिसांकडे तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी तांत्रीक तपासाद्वारे उरळी देवाची येथून त्यांच्या राहत्या घरातून सोमवारी (दि.3) अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा पुढिल तपास दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे हे करत आहेत. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.