- October 14, 2022
- No Comment
खोटी कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून २२ कोटींची फसवणूक
चऱ्होली: नागरिकांकडून कागदपत्रे घेऊन त्याआधारे फायनान्स कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या आहेत, असे दाखवत फायनान्स कंपनीचा 22 कोटी 74 लाख 43 हजार 763 रुपयांची फसवणूक केली आहे.
हा प्रकार सन 2018 ते सन 2020 या कालावधीत चऱ्होली बुद्रुक येथील सुखकर्ता इलेक्ट्रॉनिक या दुकानात घडला.
पवन कुमार गोकुळ चौधरी (वय 30, रा. वाघोली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रितेश पोपट शिवले (रा. चऱ्होली) आणि त्यांचे अनोळखी सेल्स एक्झिक्युटिव्ह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवले यांचे सुखकर्ता इलेक्ट्रॉनिक हे दुकान आहे. त्या दुकानात शिवले आणि अन्य सेल्स एक्झिक्युटिव्ह यांनी मिळून टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड या फायनान्स कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा बहाणा केला. नागरिकांकडून घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या नावावर फायनान्स कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतल्याचे भासवले. खोटी कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून दोन वर्षात 22 कोटी 74 लाख 43 हजार 763 रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोन वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिघी पोलीस तपास करीत आहेत.