- October 15, 2022
- No Comment
दुचाकी चोरणारा अटकेत,सतरा मोटारसायकल जप्त
पुणे: सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सराईत चोरटा हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई फरासखाना पोलिसांनी केली आहे. यासाठी पोलिसांनी आठ दिवसात 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेज तपासल्या होत्या.
सोहेल युनुस शेख (वय 26, रा.देहुरोड) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 17 दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील रेड लाईट एरियामधून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. याचा पोलीस तपास करत असताना सीसीटीव्हीमध्ये चोरी करणारे हे कैद झाले होते. यावेळी फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार वैभव स्वामी व पोलीस नाईक प्रवीण पासलकर यांनी चोरी झालेल्या परिसरातील व देहुरोडपर्यंतचे 150 ते 200 सीसीटीव्ही तपासले. यावेळी संशयीत शेख हा बुधवार पेठ येथील दाणे आळी येथे दिसून आला.
पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या दुचाकीची विचारणा केली असता ते चोरीचे असल्याचे समोर आले. त्याच्यावरील 15 दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले असून त्यात 14 गुन्हे हे फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असून एक गुन्हा हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल आहे. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून 4 लाख 40 हजार रुपयांच्या 17 दुचाकी जप्त केल्या आहेत. याचा पुढिल तपास फरासखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे करत आहेत.
ही कारवाई फरासखाना पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अमंलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, महावीर वल्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, किशोर शिंदे, गणेश आटोळे, सुमित खुट्टे, पंकज देशमुख, तुषार खडके, अजित शिंदे यांच्या पथकाने केली.